देशभरात सध्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांकडून पुरस्कार परत करण्याचे वारे वाहत असताना पदवीधर विद्यार्थ्यांनीही पदवी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  श्रीनगरमधील एका विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
श्रीनगरमधील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयातून समीर गोजवारी या तरुणाने एमबीए केले असून या विद्यार्थ्यांचा १९ ऑक्टोबर रोजी दीक्षांत सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात सहभागी होण्यास समीरने नकार दिला आहे. देशातील नागरिकांकडून स्वातंत्र्य हिरावण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असल्याचे सांगत स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. समीरने फेसबुकवर ही माहिती दिली आहे.
साहित्यिकांपाठोपाठ आता विद्यार्थ्यानेही केंद्र सरकारविरोधात निषेधाचे हत्यार उपसल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.