पोटनिवडणुकीत काँग्रेसला चार, तर भाजपला केवळ तीन जागा

दिल्ली महापालिकेवर (एमसीडी) वर्चस्व असलेल्या भाजपला पोटनिवडणुकीत चांगलाच दणका बसला आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या असून ‘आप’ने पाच जागा जिंकून प्रवेश केला आहे, तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत.

दिल्ली महापालिकेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आप बाजी मारील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, केजरीवाल सरकारच्या लोकप्रियतेचा तो मापदंडही मानण्यात येत होता. तर काँग्रेसचा विजय हा त्या पक्षाचे शहरांत पुनरुज्जीवन होत असल्याचे संकेत देणारा आहे. दिल्लीच्या

दक्षिण भागातील प्रभागातून काँग्रेसचा एक बंडखोर अपक्ष म्हणून विजयी झाला. दिल्ली महापालिकेचे २०१२ मध्ये त्रिभाजन झाले तेव्हापासून एक दशक त्यावर भाजपचे राज्य होते, १३ प्रभागांपैकी सात प्रभागांत भाजपचे नगरसेवक होते.

‘नोटा’चा मोठय़ा प्रमाणात वापर

दिल्लीतील महापालिका पोटनिवडणुकीत २,३३२ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यावेळी ‘नोटा’च्या वापराचीही माहिती देण्यात आली. एकूण मतदानाच्या ०.७६ टक्के मते ‘नोटा’ला नोंदविण्यात आली. यावरून नोटाचा वापर वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.