कर्करोगाच्या पेशींची वाढ ओळखणारे उपकरण तयार करण्यात आले असून ते पेशींकडून आलेले रासायनिक संदेश टिपते व कर्करोग पेशींची वाढ किती झाली आहे हे सांगू शकते. जैववैद्यकीय अभियंत्यांनी हे उपकरण शोधून काढले आहे. कर्करोगाची वाढ बिनचूक समजल्याने औषध योजनाही प्रभावीपणे करता येईल, असे टोरांटो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
कर्करोगाची वाढ ओळखणाऱ्या या यंत्रात वैज्ञानिकांनी डिजिटल सूक्ष्मद्रायूंचा वापर केला आहे. त्यात लहान चेकरबोर्डसारखे दिसणारे इलेक्ट्रॉन असतात व त्यांच्या भोवती पाण्याचे सूक्ष्म थेंब फिरत असतात. या सूक्ष्मद्रायूंच्या मदतीने पेशींकडून आलेले संदेश घेतले जातात व त्यांचा अर्थ लावता येतो. विशिष्ट प्रकारची व्होल्टेजेस लावून आपण विद्युतक्षेत्र तयार करतो ते या पाण्याच्या थेंबांभोवती फिरते. यात एक विशिष्ट रसायनांचे मिश्रणही असते, त्यात रासायनिक संदेशांमुळे बदल होत जातात व ते १०० अंकांपर्यंत टिपले जाऊ शकतात.  माणसाच्या शरीरात संप्रेरके असतात व ते आपल्या पेशींची वाढ, विभाजन व प्रसार या विषयी बरेच काही सांगत असतात, असे अल्फॉन्सस एनजी यांनी म्हटले आहे. माणसाच्या शरीरात पेशी सारख्याच पद्धतीने संदेश पाठवतात असे नाही, काही वेळा ते वेगळे असू शकतात. साधारण १० टक्के पेशी स्पष्ट प्रतिसाद देतात. स्तनाच्या कर्करोगात हे तंत्र जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येते. काही पेशी इतर पेशींच्या तुलनेत पाच मिनिटे आधी प्रतिसाद देतात. विशेष म्हणजे ज्या पेशी जास्त स्पष्ट प्रतिसाद देतात, त्या गाठ तयार होण्याच्या खूप आधीच्या अवस्थेत असतात. या संशोधनातून पुढे अशा पेशी किंवा प्रोटिन शोधून काढता येतील ज्यांच्यावर औषधांचा मारा करून कर्करोगावर उपचार शक्य होतील. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

* माणसाच्या शरीरात संप्रेरकांसारखी रसायने असतात
* पेशींमधील रासायनिक बदल टिपण्याची यंत्रणा विकसित
* कर्करोगाची वाढ होत असल्याचे लवकर लक्षात येते
*  नवीन ठिकाणी कर्करोगाची वाढ होत असेल तरी समजते
* नवीन प्रकारची औषधे तयार करण्याकरिता संशोधनाचा उपयोग