News Flash

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा

यंदा प्रथमच एमएचटी-सीईटीत अभियांत्रिकी प्रवेशेच्छुकांची संख्या कमी

यंदा प्रथमच एमएचटी-सीईटीत अभियांत्रिकी प्रवेशेच्छुकांची संख्या कमी

भरमसाट शिक्षण शुल्क आणि आर्थिकदृष्टय़ा स्थिरस्थावर होण्यासाठी लागणारा सुमारे दहा वर्षांचा काळ यामुळे वैद्यकीयऐवजी अभियांत्रिकी शिक्षणाचा तुलनेत सोपा आणि झटपट यशाचा मार्ग विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होता. परंतु आता चित्र बदलले असून अभियांत्रिकी शिक्षणाला गेल्या चार-पाच वर्षांत आलेल्या अवकळेमुळे पुन्हा एकदा वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढू लागला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता महाराष्ट्र सरकारतर्फे ५ मे रोजी घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून तर हा बदल अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे.

नीट आणि जेईईची मधली काही वर्षे सोडल्यास या महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीतून गेली १०-१२ वर्षांहून अधिक काळ राज्यातील प्रवेश करण्यात येत आहेत. परंतु, कधीच अभियांत्रिकीच्या तुलनेत वैद्यकीयच्या प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त नव्हती. परंतु, यंदा प्रथमच अभियांत्रिकीपेक्षा वैद्यकीयला नोंदणी करणारे विद्यार्थी अधिक आहेत. वैद्यकीयच्या गेल्या काही वर्षांत वाढलेल्या आकडेवारीवरूनही हे चित्र स्पष्ट होते. २००६मध्ये अवघ्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीयसाठी एमएचटी-सीईटीत नोंदणी केली होती. २०११ मध्ये ४५ हजार तर २०१२ला ही संख्या ५५ हजार अशी वाढली. त्यावेळी अभियांत्रिकीचे प्रवेशेच्छुक होते, १.१९ लाख विद्यार्थी. परंतु, आता नोंदणी केलेल्या ४.०९ लाख विद्यार्थ्यांपैकी १.४१ लाख विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे. तर अभियांत्रिकी प्रवेशेच्छुक आहेत अवघे १.२६लाख विद्यार्थी. उर्वरित विद्यार्थ्यांना या दोन्ही अभ्यासक्रमाबरोबरच औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशात रस आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्षात १.४१ लाख पेक्षाही अधिक असू शकेल. मधल्या काळात २०१३ला पहिल्यांदा नीट झाली तेव्हाही तब्बल १.०३ लाख विद्यार्थ्यांनी राज्यातून ही परीक्षा दिला होती, तर २०१४ला ती १.४८ लाख अशी वाढली होती.

हा बदल एका वर्षांत झालेला नाही. गेली काही वर्षे हळुहळू वैद्यकीय प्रवेशोच्छुक विद्यार्थी वाढत आहेत. त्यातच यंदा सरकारी व खासगी महाविद्यालयांकरिता एकत्रिपणे सीईटी होत असल्यानेही वैद्यकीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते. पण, यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणे ही लक्षणीय बाब आहे.
– सीईटी-सेलमधील एक अधिकारी

गेल्या काही वर्षांत आयटीचा फुगलेला फुगा फुटल्याने पुन्हा एकदा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत.
– डॉ. मानसिंग पवार, अधिष्ठाता, सरकारी दंत महाविद्यालय.

१८,९६५ राज्यातील सरकारी-खासगी-अभिमत विद्यापीठातील वैद्यकीयच्या एकूण जागा १५,९९० एमएचटी-सीईटीतून भरल्या जाणाऱ्या जागा

वैद्यकीय प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या संख्येत २०१२च्या तुलनेत यंदा तब्बल दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीपेक्षा विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रच खुणावणारे ठरते आहे.

* डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय काही मोजके अभ्यासक्रम आणि महाविद्यालयातील पदवीधरवगळता अभियांत्रिकी पदवीधरांची नोकरीच्या क्षेत्रात घटलेली मागणी आणि अभियांत्रिकी शिक्षणाच घसरलेला दर्जा यामुळे हा बदल होत असावा.

* एका वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 2:34 am

Web Title: medical students increases in mumbai
Next Stories
1 काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदाकडे
2 रेल्वेने ३०० कोटींचा सेवाकर बुडवल्याची चौकशी
3 पाकिस्तानी अल्पसंख्याक निर्वासितांना केंद्राकडून सवलती
Just Now!
X