मेघायलचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनामध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या जरी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तरी ती दु:खद गोष्ट असल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. एका खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मलिक झुंझनुं येथे आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आंदोलन एवढ्या दिर्घकाळ चालणं हे कोणाच्याही फायद्याचं नसल्याचं मत मलिक यांनी व्यक्त केलं. पुढे बोलताना, एखादं कुत्रं मेलं तरी आपले नेते दु:ख झाल्याचा संदेश प्रसिद्ध करतात. इथे २५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी कोणी काही बोललं नाही. हे मला फार वेदना देणारं आहे, असं भावनिक वक्तव्यही मलिक यांनी केलं.

निकाली लागू शकत नाही असा कोणताही प्रश्न नसतो असं सांगतानाच राज्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये फारसं अंतर नाहीय. चर्चा करुन या प्रश्नावर तोडगा शोधता येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केलाय. राज्यपालांनी किमान आधारभूत मूल्य म्हणजेच एमएसपी या एकमेव मुद्द्यावरुन वाद सुरु असल्याचे म्हटलं आहे. जर एमएसपीला कायदेशीर मान्यता दिली तर हा प्रश्न सहज सुटू शकेल असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं आहे. “आता देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आंदोलनाचा मुद्दा पोहचला असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. संविधाने दिलेल्या एका वरिष्ठ पदावर असल्याने मी शेतकऱ्यांना आणि नेत्यांना केवळ सल्ला देऊ शकतो,” असंही राज्यपाल मलिक आपली शेतकरी आंदोलनासंदर्भातील भूमिका मांडताना म्हणाले आहेत.

यापूर्वी रविवारी राज्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू घेताना, ज्या देशातील शेतकरी आणि लष्करी जवान समाधानी नसेल तो देश कधी पुढे प्रगती करु शकत नाही असं म्हटलं होतं. केंद्र सरकारने एमएसपीला कायदेशीर मान्यता दिली तर आंदोलक शेतकऱ्यांचं समाधान होईल असंही मलिक म्हणाले होते. “आजच्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बाजूने एकही कायदा लागू करण्यात आलेला नाहीय. या परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. ज्या देशातील शेतकरी आणि लष्करी जवान असंतुष्ट असेल तो देश कधीच प्रगती करु शकत नाही. अशा देशाला कोणीही वाचवू शकत नाही. त्यामुळे आपल्या लष्कराला आणि शेतकऱ्यांना संतुष्ट केलं पाहिजे,” असं मलिक म्हणाले होते.

देशातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना, “या बिचाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती तुम्ही बघा. ते लोकं पिकं घेतात आणि त्या पिकांचे दर प्रत्येक वर्षी कमी होतात. ज्या गोष्टी ते विकत घेतात त्याच्या किंमती दरवर्षी वाढतात. आपण गरीब कसे होत आहेत हेच त्यांना समजत नाहीय. जेव्हा बियाणं लावतात तेव्हा दर वेगळे असतात आणि जेव्हा उत्पादन घेतात तेव्हा दर ३०० रुपयांनी घसरतात,” असं मलिक यांनी म्हटलं होतं.