सुमारे १३ हजार कोटींच्या कर्ज घोटाळा तपासात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मेहुल चोक्सीसह इतरांच्या २१८ कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेवर टांच आणली.

मेहुल चोक्सीच्या भारतासह इतर देशांमधील मालमत्तांवर टांच आणण्यासाठी ईडीच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) तीन तात्पुरते आदेश जारी केले, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्यांच्या मालमत्तांवर टांच आणण्यात आली आहे, त्यात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, निरव मोदी याचा जवळचा सहकारी मिहिर भन्साळी, ए.पी. जेम्स व ज्वेलरी पार्क नावाच्या कंपन्या यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या व टांच आणलेल्या मालमत्तांची एकूण किंमत २१८.४६ कोटी रुपये असल्याचीही माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.