अमेरिकेने इशारा दिल्यानंतर मेक्सिकोने देशात राहत असलेल्या तब्बल ३११ भारतीयांची हकालपट्टी केली आहे. मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप ३११ भारतीयांवर आहे. हकालपट्टी करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय शुक्रवारी सकाळी बोईंग ७४७-४०० चार्टर विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. याबाबत मेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इंस्टिट्यूटकडून माहिती देण्यात आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या भारतीयांना अमेरिकेत जाण्यासाठी जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च आला. ऐजंट या पैशांमध्ये मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पोहचणार होता. या सर्व प्रोसेसमध्ये त्यांना यासाठी नाहक त्रास सोसावा लागला.

ज्या भारतीयांकडे अमेरिकेत राहण्याची परवानगी नाही त्यांची तोलूका एयरपोर्टवरून दिल्लीकडे रवानगी केली आहे. माघारी पाठवण्यात आलेल्या भारतींयाकडे याठिकाणी राहण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती. या सर्वांना इमिग्रेशन प्रशासनसमोर हजर करण्यात आले. या सर्व भारतीयांना ओक्साका, कॅलिफोर्निया, वेराक्रूज, चियापास, सोनोरा, मेक्सिको सिटी, डुरंगो आणि टॅबास्को राज्यातील आधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याची माहिती नॅशनल मायग्रेशन इंस्टीट्यूट (आयएनएम) ने बुधवारी दिली होती.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जूनमध्ये घुसखोरीला लगाम लावण्यासाठी मेक्सिकोच्या सिमेवर सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते.