सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादवने जेवणाच्या सुमार दर्जाविषयी केलेल्या आरोपाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. अहवालात गृहमंत्रालयाने तेज बहादूरने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तेज बहादूरच्या तक्रारीत तथ्य आढळलेले नाही असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

सीमा सुरक्षा दलातील तेज बहादूर यादव या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तेज बहादूरने जवानांना मिळणा-या जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारकडून देशभक्तीचे दाखले दिले जात असताना जवानांना मिळणा-या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले होते. या व्हिडिओत तेज बहादूरने त्यांना दररोज पुरेसे आणि चांगले अन्न मिळत नसल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर अनेकदा आमच्यावर उपाशीपोटी झोपायची वेळ आल्याचा दावा त्याने केला होता.

सोशल मीडियावर तेज बहादूर यादवचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांकडून सुरू असणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. या भ्रष्ट अधिका-यांमुळे सीमा रेषेवरील जवानांना कसा त्रास सहन करावा लागतो हेदेखील समोर आले होते. या व्हिडीओवरुन टीका सुरु होताच पंतप्रधान कार्यालयाने गृह मंत्रालयाकडून अहवाल मागितला होता. तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

शुक्रवारी गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात गृहमंत्रालयाने बीएसएफ जवानांना दिल्या जाणा-या अन्नधान्यात कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. या जवानांना दिल्या जाणा-या जेवणाची नियमितपणे तपासणी केली जाते असेही अहवालात म्हटले आहे. सीमा रेषेवरील कोणत्याही पोस्टवर अन्नधान्याची टंचाई भासू नये याची दक्षता बीएसएफ घेत आहे. कोणत्याही जवानाने अद्याप याविषयी तक्रार केलेली नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, तेज बहादूरच्या व्हिडीओ प्रकरणानंतर गृहखात्याने निमलष्करी दलाच्या जवानांच्या तक्रारींना गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जवानांना दिले जाणा-या जेवणाचा दर्जा सुधारणे आणि कामाच्या परिस्थितीमध्येही सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेज बहादूर प्रकरणात बीएसएफची भूमिका आधीपासूनच वादग्रस्त होती. तेज बहादूरच्या दाव्याची चौकशी करण्याऐवजी बीएसएफचे अधिकारी त्याच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते.  तेज बहादूरची कारकिर्द वादग्रस्त आहे. त्याच्यावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली होती. मद्यप्राशन करणे, अधिका-यांसोबत उद्धटपणे वर्तन करणे, वारंवार सुटी घेणे अशा विविध कारणांमुळे तेज बहादूर नेहमीच वादाच्या भोव-यात असायचा असे बीएसएफमधील अधिका-यांचे म्हणणे होते. तेज बहादूचे समुपदेशनही करण्यात आले होते असा बीएसएफचा दावा होता. व्हिडीओ समोर येताच तेज बहादूरची बदली करण्यात आली होती.