उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या मंत्रिमंडळचा बुधवारी पहिल्यांदा विस्तार होत आहे. मात्र, या अगोदर मंगळवारी योगी सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामासत्र सुरू केले आहे. मंगळवारी कॅबिनेट मंत्री राजेश अग्रवाल यांनी राजीनामा दिला आहे. याशिवाय शिक्षण मंत्री अनुपमा जायसवाल यांनी देखील राजीनामा सोपवला आहे. तर, यांच्या व्यतिरिक्त चेतन चौहान, मुकुट बिहारी वर्मा, स्वाती सिंह, अर्चना पांडे यांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती आहे.

खरतर मंत्रिमंडळ विस्ताराअगोदर काही मंत्र्यांची गच्छंती होणार हे निश्चित मानले जात होते. या मंत्र्यांच्या जागी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

माध्यमांवरील चर्चेनुसार उत्तर प्रदेशच्या नव्या मंत्रिमंडळात जवळपास १५ नव्या चेहऱ्यांना स्थान दिले जाणार आहे. ज्यामध्ये मुजफ्फरनगरचे आमदार कपिल देव अग्रवाल, बुलंदशहरचे अनिल शर्मा, फतेहपूर सिकरीचे उदय भान सिंह, पूर्वांचलचे सतीश द्विवेदी यांची नावे आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात ४७ मंत्री होते. ज्यापैकी रीटा बहुगुणा जोशी, डॉक्टर एस पी सिंह बघेल आणि सत्यदेव पचौरी हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराअगोदर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी देखील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. रविवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. भाजपातील एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.