एमएच ३७० या मलेशियाच्या विमानास बेपत्ता होऊन १०० दिवस उलटूनही अद्याप त्या विमानाचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. या प्रकरणी एक नवीन पुस्तक येऊ घातले असून, विमान पद्धतशीरपणे बेपत्ता करण्यात आले असल्याचा आरोप या पुस्तकात करण्यात आला आहे. तर मलेशिया सरकारने मात्र विमान शोधण्याप्रती आपली बांधीलकी कायम असल्याचे म्हटले आहे.
विमान बेपत्ता झाल्याच्या १०० व्या दिवशी ‘त्या’ दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तसेच या विमानाचे नेमके काय झाले त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ट्विप्पणी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी केली आहे. तब्बल १४ आठवडे २६ देशांची पथके या बेपत्ता विमानाचा शोध घेण्याचे काम करत आहेत आणि या विमानाचे नेमके काय झाले याचा शोध लावणे हे आमचे कर्तव्य आहे, अशी भावना प्रभारी वाहतूक मंत्री हिशमुद्दीन हुसैन यांनी व्यक्त केली.
नवे पुस्तक, खळबळजनक दावा
बीजिंग येथे जाणारे बोइंग ७७७ हे विमान २३९ प्रवाशांना घेऊन मलेशियाहून निघाले होते. ८ मार्च रोजी हे विमान संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले. यामध्ये १५४ चिनी नागरिक, ५ भारतीय प्रवाशांचा समावेश होता. मात्र हा अपघात नव्हता, तर हे दुष्कृत्य पूर्वनियोजित होते, असा दावा न्यूझीलंडमधील दोघा लेखकांनी केला आहे. या लेखकद्वयीने लिहिलेले ‘गुड नाइट मलेशियन ३७० : द ट्रथ बिहाइंड लॉस ऑफ फ्लाइट ३७०’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे, त्यात हा दावा करण्यात आला आहे. एवान विल्सन आणि जेफ टेलर अशी या दोघांची नावे आहेत.