– चंदन हायगुंडे

पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तरूण माओवादी कमांडर झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगढ येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. छत्तीसगढ पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे याचे नाव आहे. रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर आहे असेही पोलिसांनी दिलेल्या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

शेलार चे नाव विश्वा असेही आहे. पुण्यातील भवानी पेठ भागात असलेल्या कासेवाडीमध्ये विश्वा रहात होता. नोव्हेंबर २०१० मध्ये तो बेपत्ता झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार जानेवारी २०११ मध्ये नोंदवण्यात आली. मात्र पुण्यातून बेपत्ता झालेला हा तरूण आता माओवादी कमांडर झाल्याची माहिती पुढे आली आहे.

छत्तीसगढ पोलिसांनी प्रसिद्ध केलेली यादी

दरम्यान छत्तीसगढ पोलिसांनी रांजनांदगावमध्ये होणाऱ्या माओवादी कारवायांबाबत एक माहिती प्रसिद्ध केली. ज्यामध्ये विश्वा असे नाव आहे. विश्वा वय २८ महाराष्ट्रातील पुण्याचा नागरिक अशी नोंद या माहितीमध्ये आहे. जी यादी पोलिसांनी तयार केली आहे ती इंडियन एक्स्प्रेसला मिळाली आहे. त्यामध्ये एकूण १४ नावं आहेत. ज्यापैकी एक नाव विश्वाचेही आहे. २०१० मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला हा तरूण आता माओवादी कमांडर झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

नववीपर्यंत शिक्षण घेतलेला शेलार हा चांगली चित्र काढत असे. शेलार कबीर कला मंचाशी संबंधित असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. तो हरवल्याची तक्रार जानेवारी २०११ मध्ये नोंदवण्यात आली होती. नोव्हेंबर २०१० मध्ये जेव्हा त्याने घर सोडले तेव्हा आपण दोन महिने एका कामासाठी मुंबईला जात आहोत असे त्याने सांगितले होते. पण नोव्हेंबर महिन्यात तो जो गेला तो परत आलाच नाही. फक्ता विश्वाच नाही तर प्रशांत कांबळे नावाच्या एका पुण्यातील तरूणानेही त्याच दरम्यान घर सोडले होते. तोदेखील शेलारप्रमाणेच माओवादी झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.