मिझोरममधील एका मंत्र्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते करत असलेल्या कामाचं नेटकरी कौतुक करत असून फोटोवर कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. व्हिआयपी कल्चर बाजूला ठेवून आर लालझिरलियाना रुग्णालयात लादी पुसताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर अवघ्या काही तासात व्हायरल झाला आहे.

मिझोरमचे उर्जामंत्री आर. लालझिरलियाना हे करोनाबाधित असूनही झोरम मेडिकल कॉलेज रुग्णालयात सेवा करत आहेत. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी करोना झाल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आलं आहे. १२ मे पासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांची पत्नी आणि मुलाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कृतीतून अनेकांची मनं जिंकली आहेत.

‘रुग्णालयातील लादीवर पडलेला कचरा साफ करण्यासाठी त्यांनी सफाई कर्मचाऱ्याला बोलवलं होतं. मात्र कोणताच प्रतिसाद न आल्याने मी स्वत: लादी पुसण्याचा निर्णय घेतला’, असं त्यांनी एका लोकल न्यूजशी बोलताना सांगितलं. ‘झाडू मारणं, लादी पुसणं हे माझ्यासाठी नविन नाही. हे मी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी गरज पडली तर करतो. आमदार मंत्री असलो तरी मी इतरांपेक्षा स्वताला वेगळं समजत नाही’, असंही त्यांनी पुढे सांगितलं. ‘या कृतीतून मला डॉक्टर आणि नर्स यांना दु:खवण्याचा कोणताच हेतू नाही. रुग्णातील स्टाफ, नर्स आणि डॉक्टर माझी काळजी घेत आहेत. माझ्या कृतीतून मी दुसऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे’, असं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

Corona: दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

आर. लालझिरलियाना यांनी स्वच्छता करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी दिल्लीतील मिझोरम निवासस्थानात स्वच्छता केली होती. तेव्हाही त्यांच्या कृतीचं कौतुक करण्यात आलं होतं.