मोबाइल फोनच्या किंमती आता महागणार आहेत. कारण केंद्र सरकारने मोबाइल फोनवरचा जीएसटी हा १२ टक्क्यांवरुन १८ टक्के इतका केला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून मोबाइल फोन महाग होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. जीएसटी परिषदेची बैठक आज पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी मोबाइल फोनवरचा जीएसटी १२ वरुन १८ टक्के करण्यात आल्याचं सांगितलं. ज्यामुळे आता १ एप्रिलपासून मोबाइल महाग होणार आहेत.

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
” मोबाइल फोनच्या किंमतीवर १२ टक्के जीएसटी लागतो तो वाढवून १८ टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत झाला आहे. मोबाइल फोन १२ टक्के जीएसटीच्या कक्षेत होता. मात्र टीव्ही, टॉर्च, गिझर, इस्त्री, हिटर, मिक्सर, ज्युसर या सगळ्यांवर १८ टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे आता मोबाइलच्या किंमतीवरही लागणार आहे.”

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता १ एप्रिलपासून मोबाइल फोनच्या किंमती वाढणार आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसटी परिषदेच्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे

इन्फोसिससोबत जीएसटीचं नेटवर्क जोडण्यासंबंधी चर्चा झाली.

जुलै २०२० पर्यंत इन्फोसिसकडून एक चांगली प्रणाली विकसित करण्यात येईल

मोबाइल फोन, काही खास पार्ट यावरचा जीएसटी १२ वरुन १८ टक्के

जीएसटी भरण्यास विलंब केल्यास १ जुलैपासून व्याज द्यावं लागणार

विमानांची देखरेख, दुरूस्ती यासाठी येणाऱ्या खर्चावरचा जीएसटी १८ वरुन ५ टक्क्यांवर

हाताने किंवा मशीनने तयार करण्यात आलेली माचिस यावचा जीएसटी १२ टक्के

२ कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या संस्थांना २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी वार्षिक रिटर्न्स भरण्यासंबंधीचे विलंब शुल्क माफ