भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्दय़ावरून काँग्रेसवर चौफेर टीकेची तोफ डागतानाच हा पक्ष आता देशावर एक प्रकारचे ओझे झाले असून देशाची सध्याची स्थिती आणि लहान मुलांची हालत बघून आपले पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे निश्चितपणे दु:खी झाले असते, असा चिमटा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत काढला.
नेहरू यांच्या जयंतीचा उल्लेख करून मोदी म्हणाले, पंडितजींना मुलांबद्दल ममत्व होते. परंतु मुले काय, देश काय, सध्याची अशी घसरती अवस्था बघितल्यावर ते निश्चित दु:खी झाले असते. मात्र, नेहरू यांचेच कुटुंबीय या परिस्थितीला जबाबदार असल्यामुळे त्यांनी आता कोणाकडे धाव घेतली असती हा प्रश्नच आहे, अशी टीका मोदी यांनी केली. टू-जी व कोळसा खाण घोटाळाप्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करून काँग्रेसने भ्रष्टाचारात पीएचडी केली आहे, असाही टोमणा त्यांनी मारला. काँग्रेसने भ्रष्टाचाराची ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ ही नवीन व्याख्या सुरू केल्याचे सांगत ‘ए’ म्हणजे ‘आदर्श’, ‘बी’ म्हणजे ‘बोफोर्स’, ‘सी’ म्हणजे ‘कोळसा घोटाळा’ तर ‘डी’ म्हणजे ‘दामाद घोटाला’ अशी त्यांची व्याख्या असल्याची तोफ मोदी यांनी डागली. कोळसा घोटाळ्यातील फायली गहाळ झाल्याचे सरकार सांगते. परंतु दिल्लीत संपूर्ण सरकारच गहाळ झाले आहे, असे ते म्हणाले. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या घरापासून १० जनपथपर्यंत एखाद्याने भ्रष्टाचाराची कथा लिहिण्यास सुरूवात केली तरी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आकडेवारी संपणार नाही, असेही  त्यांनी सुनावले. जोगी व त्यांच्या कुटुंबियांचा उल्लेख करून मोदी यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही शरसंधान केले. ‘कोणाची तरी पत्नी, कोणाचा तरी मुलगा निवडणूक लढवित आहे व स्वत: वडीलही विविध ठिकाणांहून रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.