भारत व चीन यांच्यादरम्यान गेल्या मे महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर तणाव उद्भवल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा मंगळवारी प्रथमच संवाद होणार आहे. शांघाय सहकार्य परिषदेच्या परिषदेनिमित्त एका आभासी संवादात हे दोघे सहभागी होणार आहेत.

याशिवाय, ब्रिक्स बैठकीनिमित्त १७ नोव्हेंबरला आणि जी-२० परिषदेसाठी २१-२२ नोव्हेंबरलाही मोदी हे जिनपिंग यांच्यासोबत एकाच आभासी व्यासपीठावर येतील. गेल्या ६ वर्षांत हे दोन नेते किमान १८ वेळा भेटले आहेत. सौदी अरेबियाने करोना महासाथीच्या प्रश्नावर गेल्या २६ मार्चला जी-२०ची आभासी बैठक आयोजित केली होती, त्यावेळी हे दोघे एका व्यासपीठावर आले होते.

भारत व चीन यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, एससीओ बैठकीत सीमेवरील तणावाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता अतिशय अंधुक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.