यापुढे भारतात दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचे मूळ पाकिस्तानात आढळले, तर लष्करी हल्ल्याचा पर्याय स्वीकारण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा अमेरिकेच्या एका माजी राजदूताने दिला आहे. आपण भूतकाळात ज्याप्रकारे वागलो, ते भविष्यात सहन केले जाण्याची शक्यता नाही, हे पाकिस्तानी लोक समजून घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या हल्ल्यानंतर भारतात तशाप्रकारच्या घटना झाल्या, त्यावेळी प्रत्येक भारतीय पंतप्रधानाने लष्करी कारवाईने उत्तर देण्याचा विचार केला, परंतु नंतर माघार घेतली. मात्र आता भारतातील भावना  मोठय़ा प्रमाणात बदलल्या असून, सध्याचे पंतप्रधान माघार घेण्याची शक्यता कमी असल्याचे मला वाटते, असे अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी म्हटले आहे.
यापुढे भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचे धागेदोरे पाकिस्तान, त्यांचे सैन्य आणि आयएसआय यांच्यापर्यंत पोहचले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानच्या भूमीवर लष्करी हल्ला करण्याची शक्यता आहे. अर्थात असे होईलच असे नाही, असे ब्लॅकविल यांनी कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर) या अमेरिकन ‘थिंक टँक’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेनंतर पत्रकारांना सांगितले.
मोदींपूर्वीच्या पंतप्रधानांना भारतीय सैन्याने त्या-त्या वेळी पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईच्या पर्यायांबाबत माहिती दिली होती, परंतु त्यांना हे पर्याय पटले नाहीत. परंतु मोदी हे वैयक्तिकरीत्या आणि भारतीय जनतेचे मत आणि समाजातील राजकीय भावना यांचे प्रतिबिंब लक्षात घेऊन लष्करी बळ वापरण्याची त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा जास्त शक्यता आहे, असे मत भारत आणि दक्षिण आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या ब्लॅकविल यांनी व्यक्त केले.
हे लष्करी बळ कशारीतीने वापरले जाईल, हा वेगळा मुद्दा आहे. दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न होईल, परंतु आपण यापूर्वी जसे वागलो, ते भारतीय पंतप्रधान खपवून घेतील का, ही बाब पाकिस्तानी लोक समजून घेतील, अशी मला आशा आहे, असे ब्लॅकविल एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
पाकिस्तानमध्ये सूत्रे असलेला मुंबईसारखा दहशतवादी हल्ला पुन्हा झाला, तर मोदी यापूर्वीच्या पंतप्रधानांपेक्षा वेगळे प्रत्युत्तर देतील, यास ब्रूकिंग इन्स्टिटय़ूटमधील परराष्ट्र धोरणाचे सीनिअर फेलो स्टीफन कोहेन यांनीही दुजोरा दिला. भारताची प्रतिक्रिया जोरदार राहील आणि कदाचित पाकिस्तानच्या भूमीतील दहशतवादी अड्डेही उद्ध्वस्त करण्यात येतील, असे ते म्हणाले.