राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांच्याकडून मंत्रिपदाची शपथ घेतेवळी शब्द उच्चारणात चूक झाल्याने विरोधकांकडून होणाऱया टीकेला लालूप्रसाद यांनी प्रत्युत्तर देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदीही चुकले होते मग, आता त्यांनीही पुन्हा शपथ घ्यावी, अशी मागणी लालूप्रसाद यांनी केली आहे.

विरोधकांच्या टीकेवर संतापलेल्या लालू यांनी प्रत्युत्तरादाखल सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नरेंद्र मोदींच्या शपथ विधीचा व्हिडिओ शेअर करत मोदींनी पंतप्रधानपदाच्या शपथविधीवेळी शब्द उच्चारणात केलेली चूक लक्षात आणून दिली. पंतप्रधानपदाची शपथ घेताना मोदींनी ‘अक्षुण्ण’ या शब्दाचा चुकीचा उच्चार करत ‘अक्षण्ण’ असे म्हटले होते. देशाच्या विभाजनाचा यांचा अजेंडाच आहे, कारण पंतप्रधानांनी एकता आणि अखंडता अबाधित राखण्याची शपथच घेतली नाही. मोदींनी अक्षुण्णऐवजी अक्षण्ण असा चुकीचा उल्लेख केल्याने त्यांनी पुन्हा शपथ घ्यावी, असे ट्विट लालप्रसाद यांनी केले आहे.

बिहारच्या शपथविधी सोहळ्यात तेजप्रताप यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना ‘अपेक्षित’ ऐवजी ‘उपेक्षित’ असा उच्चार केला होता. चुकीच्या उच्चारामुळे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी तेजप्रताप यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. लालूपुत्राच्या याच चुकीचा धागा पकडून विरोधकांनी लालू आणि तेजप्रताप यांना लक्ष्य केले होते.