18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

मोदींचा गडकरींविरुद्धचा ‘गेम’ उघड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात भाजपमधून होत असलेल्या मोर्चेबांधणीचे सूत्रधार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: November 13, 2012 4:50 AM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात भाजपमधून होत असलेल्या मोर्चेबांधणीचे सूत्रधार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचा दावा सोमवारी गडकरी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी फेटाळून लावला. वैद्य यांनी व्यक्त केलेल्या संशयाला फारसे महत्त्व न देता पक्ष पूर्णपणाने गुजरातच्या निवडणुकीत गुंतलेल्या मोदी यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा भाजपने दिला आहे. पण, वैद्य यांनी गडकरींविरोधात सक्रिय झालेल्या नरेंद्र मोदींना उघडे पाडल्याचे मानले जात आहे.
अंतर्गत कलहाने ग्रस्त असलेल्या भाजपने मा. गो. वैद्य यांच्या आरोपाचे ठामपणे खंडन करताना मोदींचा बचाव केला आहे. वैद्य यांचा मोदींविषयीचा दावा सर्वस्वी निराधार असून, भाजपचे सर्व केंद्रीय नेते आणि मुख्यमंत्री एकसंधपणे पक्षाचे काम करीत असल्याचे गडकरी यांनी एका निवेदनात स्पष्ट केले आहे. पण गडकरी यांच्याविरोधात बोलणारे राम आणि महेश जेठमलानी यांना कोणाची फूस आहे, ही बाब या निमित्ताने ऐरणीवर आली असून त्यात मोदी उघडे पडले असल्याचे भाजप नेते खासगीत मान्य करीत आहेत.
जेठमलानी आणि त्यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांचे नाव जाहीर करण्याची मागणी करीत गडकरींना लक्ष्य केले असताना मोदी गंमत बघत होते. गुजरात दंगलींप्रकरणी मोदींचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करणारे ८९ वर्षांचे राम जेठमलानी यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यास मोदींनी भाग पाडले, हे येथे उल्लेखनीय ठरले आहे. गडकरी यांनी पक्षात संजय जोशी यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोदींनी आपले वजन वापरून जोशींची गच्छंती करविली. त्यानंतर मोदींनी गडकरी यांनाच जेठमलानी व अन्य नेत्यांच्या माध्यमातून लक्ष्य करण्याची मोहीम आरंभिली, अशी भाजपमध्येही गेल्या काही दिवसांपासून दबल्या आवाजात चर्चा होती. गडकरींवर आगपाखड करणारी जेठमलानींची विधाने खोडून काढण्याऐवजी त्यावर मोदींनी एक प्रकारे मूकसंमतीच व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर वैद्य यांच्या ब्लॉगमुळे मोदी यांची पडद्यामागची भूमिका उघड झाली आहे.
गडकरी यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यात लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथ सिंह हेही सक्रिय झाले होते. संघाचे समर्थन लाभलेल्या गडकरींविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मोहोळ उठवून त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी करायची. नंतर अध्यक्ष कुणीही झाला तर चालेल, या समान ध्येयाने ही मंडळी स्वतंत्रपणे गडकरी हटाव मोहीम राबवीत असल्याची चर्चा आहे.   

First Published on November 13, 2012 4:50 am

Web Title: modi planning open play against gadkari