आसामातील कोक्राझार आणि बक्सा या जिल्ह्य़ांत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या थैमानावरून राजकारण्यांमध्ये मात्र परस्परांवर चिखलफेक सुरू झाली आहे.
कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्य़ांत उसळलेल्या हिंसाचारावरून शनिवारी राजधानी दिल्लीत मात्र आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले. आसामातील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय कायदामंत्री कपिल सिबल यांनी मोदींवरच निशाणा साधला. आसामातील हिंसाचाराला तेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. भारताचे विभाजन करणारे प्रारूप म्हणजे मोदी असेही सिबल म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही आसाम हिंसाचाराच्या मुद्दय़ावरून मोदींवर तोंडसुख घेतले. आसामात प्रचार करताना मोदींनी विखारी भाषा वापरली त्यामुळेच हिंसाचाराचा आगडोंब उसळला असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही भाजपला फटकारले. आसामातील हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
भाजपचे प्रत्युत्तर
सिबल आणि अब्दुल्ला यांच्या आरोपांचा समाचार भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी घेतला. गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान मनमोहन सिंग आसामातून राज्यसभेवर निवडून येतात. मात्र, या दहा वर्षांत त्यांनी आसामसाठी काहीही केले नाही. तेथील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. तर अब्दुल्ला यांना त्यांच्याच राज्यातील लोक गांभीर्याने घेत नसल्याने त्यांच्या टीकेला महत्त्व देत नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.