दीपावलीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्य दलातील जवानांना आणि देशवासियांना स्वतःमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्रिसुत्री सांगितली. या त्रिसुत्रींचा अवलंब करण्याचा आग्रह त्यांनी जनतेसमोर धरला. जैसलमेर येथे सीमेवर बीएसएफच्या जवानांसोबत मोदींनी आज दिवाळी साजरी केली यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “आजच्या दिवशी मी आपल्याला तीन गोष्टींचा आग्रह करणार आहे. यांपैकी पहिली गोष्ट् म्हणजे, आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही ना काही नवं शोधण्याची सवय लावून घ्या, याला आपल्या जीवनाचा भाग बनवा. आजकाल अनेक ठिकाणी आपले जवान महत्वपूर्ण संशोधनं करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे योगासनांना आपल्या जीवनाचा भाग बनवा. तिसरी गोष्ट ही की आपली मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजीशिवाय कमीत कमी एक भाषा जरुर शिका. हे सर्व केलत तर तुमच्यामध्ये एक नवी ऊर्जा संचारेल.”

सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो – पंतप्रधान

आपण आहात तर देश आहे. आपण देशातील लोकांचा आनंद आहात. मी आज आपल्याकडे सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद आपल्यासाठी घेऊन आलोय, अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएफच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.