पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘प्रमुख सुधारक’ संबोधणे काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. काँग्रेस प्रवक्ते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी मोदी सरकार गरीबविरोधी असल्याचा घणाघाती हल्ला चढवला. यापुढे त्यांच्या प्रत्येक परराष्ट्र भेटीदरम्यान पक्षाच्या एका प्रवक्त्यास पाठविले जाणार असल्याची घोषणा शर्मा यांनी केली. एक प्रकारे थेट मोदी यांना आव्हान देणारी ही रणनीती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ५७ दिवसांच्या दीर्घ सुट्टीनंतर काँग्रेसने आखली आहे. शर्मा म्हणाले की, मोदी यांनी केवळ देशवासीयांनाच नव्हे, तर बराक ओबामा यांनाही भ्रमित केले आहे. तब्बल ४२ वर्षांनी कॅनडाला जाणारे भारतीय पंतप्रधान अशी शेखी मिरवणाऱ्या मोदी यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी २०१० मध्ये तीन दिवस कॅनडाचा दौरा केला होता, हे ठाऊक नाही का, असा संतप्त सवाल शर्मा यांनी विचारला.
ओबामा यांनी मोदींचे कौतुक केल्याने काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मोदी सरकारची धोरणे गरीबविरोधी असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. या धोरणांचा भांडाफोड मोदी ज्या देशात जातील तिथे करू. मोदी सातत्याने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारभारावर परदेशात टीका करीत आहेत. त्यावर शर्मा यांनी आक्षेप घेतला. मोदी परदेशात भाजपचे पंतप्रधान म्हणून जातात, असा टोमणा त्यांनी मारला. भारतात भ्रष्टाचार होता; पण आता भारत कुणाकडेही हात पसरणार नाही, अशा आशयाचे विधान मोदी यांनी केले होते. ‘ज्यांना घाण करायची होती; त्यांनी केली. आम्ही मात्र स्वच्छता करू’, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या कारभारावर हल्ला चढवला होता.
त्यावर आक्षेप घेत, यापूर्वी भारत काय कुणापुढे हात पसरत होता का, अशी विचारणा शर्मा यांनी केली. परदेशात विरोधकांवर टीका करणाऱ्या मोदी यांनी ते भारताचे पंतप्रधान आहेत, भाजपचे वा आरएसएसचे प्रचारक नाहीत, असे शर्मा म्हणाले. मोदींच्या वक्तव्यावरून ते किती दूषित राजकारण करतात हे स्पष्ट होते. देशांतर्गत मतभेदांवर परदेशात चर्चा करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न शर्मा यांनी विचारला. याप्रकरणी त्यांनी माफी मागावी अशी मागणी शर्मा यांनी केली. अशा टीकेवरून त्यांची मानसिकता दिसून येते अशी टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2015 रोजी प्रकाशित
..तर पंतप्रधानांना जशास तसे उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘प्रमुख सुधारक’ संबोधणे काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. काँग्रेस प्रवक्ते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी मोदी सरकार गरीबविरोधी असल्याचा घणाघाती हल्ला चढवला.
First published on: 18-04-2015 at 02:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi should behave like a pm not an rss pracharak