नवी दिल्ली : द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये हरियाणातील मोहित गुप्ताने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशात पहिला आलेला हरियाणाच्या मोहित गुप्ताने ७३.३८ टक्के गुण मिळवले आहेत. दुसरा आलेल्या नवी दिल्लीतील प्रशांतने ७१.३८ टक्के तर दिल्लीच्या आदित्य मित्तलने ७०.६२ टक्क्यांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे.

नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या या परिक्षेला एकूण ६० हजार ५८५ विद्यार्थी बसले होते. देशभरातून ३२७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. यांपैकी ९ हजार ४८९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदाचा निकाल २२.७६ टक्के इतका लागला आहे.

या परिक्षेतील ग्रुप वनच्या परीक्षेत एकूण ३९ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी १५.९१ म्हणजेच ६ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ग्रुप टूमध्ये एकूण १५.११ टक्के निकाल लागला आहे. दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा दिलेल्या एकूण ३० हजार ५४ परिक्षार्थींपैकी ६ हजार ८४१ विद्यार्थी पास झाले आहेत.