तेलमंत्री वीरप्पा मोईली यांनी आज बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांच्या घरापासून कार्यालयात जाण्यासाठी मेट्रोचा वापर केला. इंधन वाचवा या मोहिमेअंतर्गत त्यांनी हा मेट्रो प्रवास केला. सध्या तेलाच्या आयातीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांनी हा एक नवा आदर्श घालून दिला आहे. आठवडय़ातून एकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा त्यांचा विचार आहे.
मोईली हे ३, तुघलक लेन या त्यांच्या निवासस्थानापासून रेसकोर्स मेट्रो स्टेशनपर्यंत चालत आले. तेथे पिवळ्या मेट्रोत बसले व दोन थांबे पुढे जाऊन केंद्रीय सचिवालयाच्या स्टेशनक या थांब्याच्या ठिकाणी उतरले तेथून तेल मंत्रालयाचे कार्यालय असलेल्या शास्त्रीभवनकडे ते चालत गेले. त्यांचा मेट्रोने प्रवास खरेतर पंधरा मिनिटांचा होता पण केंद्रीय मंत्री सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणार असल्याने मीडियाचे लोक त्यांच्या मागावर होते. पत्रकारांनी मोईली हे त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताच त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी बरीच गर्दी केली होती, रेसकोर्स ते मेट्रो स्टेशन हे अंतर पायी जाण्यासाठी ५ मिनिटांचे असताना त्याला २५ मिनिटे लागली. यापुढे बुधवार हा सर्व तेल कंपनी कर्मचारी व मंत्रालयातील लोकांसाठी यापुढे सार्वजनिक वाहतूक दिवस किंवा बस डे असणार आहे.
मोईली यांनी सांगितले, तेल आयातीवर गेल्या आर्थिक वर्षांत १४५ अमेरिकी डॉलर खर्च झाले. आम्ही देशांतर्गत तेल उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत त्याच्या जोडीला तेल आयातीचा खर्च कमी करण्यासाठी आपण इंधन वाचवले पाहिजे. कारण आयात-निर्यात खात्यातील तूट वाढतच चालली आहे.
मोईली यांनी सांगितले की, यापुढे प्रत्येक बुधवारी आपण, तेल मंत्रालय व तेल कंपन्यांचे कर्मचारी अधिकारी संपूर्ण देशात सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार आहेत. तेल मंत्रालयाचे सह सचिव नीरज मित्तल, अरमाने गिरीधर यांनी सरळ सायकलवर टांग मारून कार्यालय गाठले. त्यांचे कार्यालय घरापासून ८ कि.मी. अंतरावर आहे. त्यांचे व्यक्तिगत सचिव संजीवकुमार यांनी वेगळी मेट्रो पकडून कार्यालय गाठले.
तेल मंत्रालयातील इतर दोनशे कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला तर तेल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कार पूल किंवा मेट्रो, बस यांचा वापर केला. मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज ६०० लिटर पेट्रोल डिझेल वाचवले. आपली मोटार दिवसभर गॅरेजमध्ये ठेवण्याचे आदेश आपण दिले, दुपारी परत येण्यासाठी व परत जाण्यासाठी मेट्रोचाच वापर करणार आहोत असे मंत्र्यांनी सांगितले. मोईली यांनी प्रवासासाठी प्रीपेड कार्ड घेतले होते व नंतर ते सर्व प्रवाशांसमवेत मेट्रो ट्रेनची वाट पाहात होते, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी मंत्र्यांना सुरक्षा कडे केले होते. दिल्ली मेट्रोत सीआयएसएफची सुरक्षा आहे.  
मोईली मेट्रोत चढले तेव्हा एका ७३ वर्षांच्या प्रवाशाने त्यांना बसायला जागा देऊ केली पण मोईली यांनी विनयाने तसे करण्यास नकार दिला. सामान्य माणसाप्रमाणे आपण प्रवास करू असे सांगून त्यांनी डोक्यावरील हँडल पकडले. इतर मंत्र्यांनाही आपण आठवडय़ात एक दिवस बस डे म्हणून पाळण्याची विनंती केली आहे.
भारत ८० टक्के खनिज तेल खरेदी करतो त्यासाठी गेल्या वर्षी १४४.२९ अब्ज डॉलर इतका खर्च गेल्या आर्थिक वर्षांत झाला होता.