संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू होत असून सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधक काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. मुस्लीम मुद्दय़ावरून भाजपने सोमवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर शाब्दिक हल्ला केला, तर महिला आरक्षण विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आणून काँग्रेसने भाजपच्या इराद्यावरच शंका उपस्थित केली.

काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याच्या पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याचा भाजपने पुन्हा समाचार घेतला. काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाचे प्रमुख नदीम जावेद यांनीच जाहीरपणे तसे सांगितल्याने भाजपच्या हाती काँग्रेसविरोधात कोलितच मिळाले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल करत भाजप नेता आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस हाच जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या अनुनयाच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. शहाबानो प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. १९८४ मध्ये शिखांविरोधातील नरसंहाराचेही काँग्रेसने समर्थन केले होते हे कसे विसरता येईल, असे जावडेकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशात झालेल्या जाहीरसभेत, काँग्रेसला फक्त मुस्लीम पुरुषांचे हित जपायचे असून मुस्लीम महिलांबाबत काँग्रेस बेफिकीर असल्याचा आरोप केला होता. त्याचा संदर्भ देत जावडेकर म्हणाले की, तिहेरी तलाकवर बंदी घालणारे विधेयक मुस्लीम महिलांच्या हिताचे असताना काँग्रेस मात्र त्याला विरोध करत आहे. मोदी सरकार हे विधेयक संमत व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. लोकसभेने हे विधेयक कधीच मंजूर केले असले तरी राज्यसभेत विरोधकांनी ते अडवून धरले आहे. त्यावरून काँग्रेसला नेमकी कोणाची चिंता आहे हे स्पष्ट होते. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भाजप भारताचे ‘हिंदू पाकिस्तान’ बनत असल्याच्या शेरेबाजीवर जावडेकर यांनी टीका केली. भाजपला नव्हे काँग्रेसलाच भारतीय समाजातील वैविधतेची माहिती नाही म्हणूनच अशी वक्तव्ये केली जात आहेत, असा आरोप जावडेकर यांनी केला.

महिला आरक्षण विधेयकासाठी राहुल गांधींचे मोदींना पत्र

गेली आठ वर्षे प्रलंबित असलेले महिलांना संसदेत आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यासाठी काँग्रेस अचानक आक्रमक झाली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून काँग्रेस या विधेयकाच्या मंजुरीसाठी सर्व साहाय्य करेल, असे स्पष्ट केले आहे. २०१० मध्ये राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले असून लोकसभेची संमती आवश्यक आहे. हे विधेयक संमत व्हावे यासाठी काँग्रेसने पाठिंब्यासाठी ३२ लाख सह्य़ा गोळा केल्या आहेत. या देशातील महिलांसाठी हे विधेयक महत्त्वाचे असून लोकसभेतील बहुमताचा फायदा घेऊन ते संमत करावे असे आवाहन राहुल यांनी केले. वास्तविक, भाजप आणि काँग्रेसचा या विधेयकाला पाठिंबा असला तरी मुलायम सिंह यांचा समाजवादी पक्ष आणि लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाने त्याला विरोध केलेला आहे. हाच मुद्दा उपस्थित करत पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस ज्या महायुतीत आहे त्यातील घटक पक्षांनीच या विधेयकाला विरोध केलेला आहे. काँग्रेसने महायुतीतून बाहेर येऊन वस्तुस्थिती पाहावी, असा शाब्दिक प्रहार जावडेकर यांनी केला.