राज्यात गेल्या चोवीस तासांत मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण आढळले. कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्या आठवडाभराने घटली. राज्यात ६७४१ रुग्णांचे निदान झाले.

देशभरातील करोनाच्या रुग्णांनी ९ लाखांचा आकडा पार केला असून गेल्या चोवीस तासांमध्ये २८ हजार ४९८ रुग्णांची वाढ झाली. एकूण करोना रुग्णांची संख्या ९ लाख ६ हजार ७५२ इतकी झाली आहे. भारताची लोकसंख्या जास्त असल्याने दररोज वाढणाऱ्या रुग्णांचे प्रत्यक्ष आकडेही जास्त दिसतात. त्यामुळे करोनाच्या परिस्थितीचे आकलन करताना गोंधळ होऊ शकतो. मात्र रुग्णवाढीचा दर सातत्याने कमी होत आहे.

दोन लसींचा प्रयोग यशस्वी..

भारतात दोन संभाव्य लसींचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी झाला असून त्यांना मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले. लसीवरील संशोधनात भारतानेही जगाबरोबर राहिले पाहिजे, असे भार्गव यांनी सांगितले.