दिल्लीतील बुराडी येथे रविवारी एकाच कुटुंबातील ११ लोकांनी आत्महत्या केली. या आत्महत्येचे रहस्य अजून उलगडलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पण अजूनही ते ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. सध्या ही सामूहिक आत्महत्या असल्याचा अंदाज आहे. पण मृतांच्या नातेवाईकांनी हे फेटाळले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. घरात मिळालेल्या डायरीत लिहिलेल्या नोंदीवरून तंत्रविद्येपायी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. या आत्महत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावरही तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेशी निगडीत अशा अनेक घटनांची इतिहासात नोंद झाली आहे. त्यातीलच एक १९७८ साली दक्षिण अमेरिकेतील गयाना येथे घडली होती. गयानात त्यावेळी तब्बल ९०९ लोकांनी एकत्रित आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे यातील एक तृतीयांश लहान मुले होते.

गयानातील पीपल्स टेंपलचे संस्थापक जिम जोन्स यांनी १८ नोव्हेंबर १९७८ ला आपल्या शेकडो शिष्यांसह आत्महत्या करण्याची योजना बनवली होती. जोन्स यांच्या अनेक अनुयायांनी आपल्या इच्छेने आत्महत्या केली होती. त्यातील काही असे होते की, त्यांना बंदुकीच्या धाकावर आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आले.

जिम जोन्स एक प्रभावशाली पाद्री होते. त्यांनी १९५० मध्ये पीपल्स टेंपलची स्थापना केली होती. त्यांच्या प्रवचनाचा शिष्यांवर मोठा प्रभाव पडायचा. काही वर्षांतच त्यांनी असंख्य आफ्रिकी अमेरिकन नागरिकांना आपले शिष्य बनवले. दुर्दैवाने १९७१ मध्ये त्यांच्या चर्चवर माध्यमांनी अनेक आरोप केले. यामध्ये आर्थिक अफरातफर, शारीरिक छळ आणि लहान मुलांबरोबर वाईट वर्तणुक आदींचा समावेश होता. या आरोपांमुळे नाराज झालेल्या जोन्सने आपल्या अनुयायांबरोबर कॅलिफोर्निया सोडून गयानाला जाण्याचा निर्णय घेतला.

जोन्स आपल्या शिष्यांबरोबर गयानाला आले पण त्यांनी जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण करू शकले नाहीत. जोन्स यांनी गयानात आपल्या चर्चला दैवी स्थळात रूपांतर करणार असल्याचे म्हटले होते. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत गेली आणि शिष्यांवरील अत्याचारात वाढ होत गेली. जोन्सचे म्हणणे न ऐकल्यास शिष्याला शिक्षा देण्यात येऊ लागली. जोन्सची मानसिक स्थिती बिघडत चालली होती. त्याचदरम्यान अमेरिका सरकार त्याच्याविरोधात असल्याचे विचार कोणीतरी त्याच्या डोक्यात घातले.

याचदरम्यान काही शिष्यांनी जोन्सविरोधात बंडखोरी केली. त्यावेळी जोन्सकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याने शिष्यांना आपण क्रांतीकारी काम करणार असल्याचे सांगितले. तो क्रांतीकारक मार्ग म्हणजेच सामूहिक आत्महत्या होता. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये आधी सर्वांत कमी वयांच्या शिष्याची क्रमांक होता. यातील बहुतांश चिमुकले होते. ज्यांना त्यांच्या आई-वडिलांनी आणि परिचारिकांनी फळांच्या रसात सायनाईड मिसळून पिण्यास दिले. नंतर युवक-प्रौढ आणि वयोवृद्धांना बंदुकीच्या धाकावर विष पिण्यास बाध्य करण्यात आले. पाहता-पाहता शेकडो लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले. अमेरिकेच्या इतिहासात १८ नोव्हेंबरची ही घटना काळ्या अक्षरांनी लिहिली गेली आहे.