ब्राझीलच्या अध्यक्षा दिलमा रोसेफ यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई काँग्रेसकडून सुरू होण्याची शक्यता असून त्यापूर्वी त्यांच्यावर दबाव टाकण्याकरिता देशात मोठय़ा प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार दोनशे शहरात किमान ३० लाख लोक काल रस्त्यावर उतरले व त्यांनी रोसेफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंदीच्या वर्षांमध्येही देशात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याच आठवडय़ात कनिष्ठ सभागृहाचे सभापती एदुआर्दो कुन्हा हे दिलमा रोसेफ यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई सुरू करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून चौकशी आयोग स्थापन करणार आहेत, कुन्हा हे दिलमा रोसेफ यांचे कट्टर विरोधक आहेत. रोसेफ यांच्या समर्थकांपासून हा आयोग अलिप्त ठेवण्यात येणार आहे. रोसेफ यांनी राजीनाम्यास नकार दिला आहे.
त्यांच्यावर पक्षातील नेत्यांकडून दबाव असून त्यांच्या आधीचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा हे हस्तक्षेप करून मंत्रिमंडळात स्थान पटकावण्याची शक्यता आहे. पण सिल्वा यांच्यावरही खटला सुरू असून सावपावलो न्यायालय काय निकाल देते यावर सगळे अवलंबून आहे. रोसेफ यांनी सांगितले की, देशातील लोकांनी शांततेने निदर्शने केली आहेत. देशात मतभिन्नता असली तरी शांततामय मार्गाने निदर्शने झाली हे सहअस्तित्वाचे लक्षण आहे. ब्राझीलची आर्थिक राजधानी असलेल्या साओपावलो येथे सर्वात मोठी निदर्शने झाली, त्यात पाच लाख लोक सहभागी होते. रिओ डि जानिरो येथे १० लाख लोक निदर्शनात सहभागी होते. देशात अराजकाची स्थिती आहे, अशी टीका साओपावलोच्या पाँटिफिकस कॅथोलिक विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक फ्रान्सिस्को फोन्सेका यांनी केली आहे.