राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका लग्नाच्या जेवणातून तब्बल १०० लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. चार मुलींचं एकाच दिवशी लग्न होतं. या लग्नात आलेल्या वऱ्हाड्यांसह मुलीच्या कुटुंबातील लोक विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना विषबाधा झाली. सर्वांना उपचारासाठी शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं.

न्यूज १८ने दिलेल्या माहितीनुसार, सरदारशहरमध्ये कालू कुचामणिया यांच्या चार मुलींचं एकाच दिवशी लग्न होतं. दोन नवरदेव बीदासर, एक लाडनू आणि नवरदेव जोधपुरहून वऱ्हाड घेऊन सरदारशहर आले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत लग्न आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वऱ्हाड निघून गेलं आणि अनेकांना पोटदुखी, उल्टी आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. सर्वांना मिळेल त्या वाहनाने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

रुग्णालयात रात्रभर एकामागे एक रुग्णांना दाखल करण्यात येत होतं. यामध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला आणि पुरुष सर्वांचा समावेश होता. एकाचवेळी रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात खाटा कमी पडल्या. तर आरोग्य अधिकाऱ्यांवर रुग्णांना अगदी जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ आली. काही रुग्ण गंभीर होते त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान वऱ्हाडातील अनेकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ते लोक आपापल्या गावी निघून गेल्याने त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्यांनी प्रकरणाची चौकशी केली. सध्या काही रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.