कठोर उपाययोजना करण्यासाठी ११ देशांचा पुढाकार
तंबाखूमुळे आग्नेय आशियात दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. तंबाखूच्या अतिवापरामुळे हे प्रमाण वाढत चालले असून, अकरा देशांनी नुकत्याच तंबाखूच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
आग्नेय आशियात २५ कोटी लोक धूम्रपान करतात आणि तेवढेच लोक विविध कारणांसाठी तंबाखू वापरतात. बहुदा ती चघळण्यासाठी वापरली जाते.
तिमोर लेस्टेची राजधानी डिली येथे तंबाखू प्रतिबंधक जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून ती आग्नेय आशियातील तंबाखूविरोधी समितीची ६८वी बठक होती. सर्व सरकारांनी, संयुक्त राष्ट्रांनी आणि सदस्य देशांनी तंबाखू नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. जगातील तंबाखूचा एकतृतीयांश वापर हा आग्नेय आशियात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार तंबाखू नियंत्रणासाठी सिगरेट व तंबाखूच्या पाकिटांवर मोठय़ा चित्राच्या स्वरूपात तंबाखूबाबत धोक्याचा इशारा देणे बंधनकारक आहे. नेपाळमध्ये वेष्टनाच्या ९० टक्के आणि थायलंडमध्ये ८५ टक्के भागात तंबाखूच्या धोक्याबाबत इशारा दिलेला असतो.

जाहीरनाम्यात काय?
’तंबाखूमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोक मरतात, त्यातील ६० लाख मृत्यू हे तंबाखूच्या थेट वापराने होतात, तर ६० हजार मृत्यू दुय्यम धूम्रपानामुळे होतात म्हणजे धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात आल्याने होतात.
’धूम्रपान न करताही केवळ धूर शरीरात गेल्याने हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग होतो. गर्भवती महिला कमी वजनाच्या बाळांना जन्म देतात.
’तंबाखूच्या धुरात चार हजार रसायने असतात, त्यातील अडीचशे हानिकारक असल्याचे सिद्ध झाले असून ५० रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो.
’तंबाखू व सिगरेटच्या पाकिटांवर धोक्याची सूचना
मोठय़ा चित्रात्मक स्वरूपात देणे आवश्यक आहे.