नवी दिल्ली : देशात पहिल्या दिवशी १.९१ लाख लाभार्थीना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली असून त्यात सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातील आहे. तेथे एकूण २१२९१ लोकांना लस देण्यात आली.

सध्या देशात २०८८२६ एकूण उपचार घेणारे रुग्ण असून त्यांची संख्या केरळात सर्वाधिक म्हणजे ६८६३३ आहे. महाराष्ट्र ५३१६३, उत्तर प्रदेश ९१६२, कर्नाटक ८७१३, पश्चिम बंगाल ७१५१, तमिळनाडू ६१२८ या प्रमाणे रुग्णांची संख्या आहे. एकूण रुग्णांची संख्या एक कोटींवर असून १.५ लाख लोक मरण पावले आहेत.

भारतात काल कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींच्या माध्यमातून लसीकरण सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशात २१२९१, आंध्र १८४१२,महाराष्ट्र १८३२८, बिहार १८१६९, ओडिशा १३७४६, कर्नाटक १३५९४, गुजरात १०७८७, राजस्थान ९२७९, पश्चिम बंगाल ९७३०, मध्य प्रदेश ९२१९, केरळ ८०६२, छत्तीसगड ५५९२, हरयाणा ५५८९, दिल्ली ४३१९, तेलंगण ३६५३, आसाम ३५२८, झारखंड ३०९६, उत्तराखंड २२७६, जम्मू व काश्मीर २०४४, हिमाचल प्रदेश १५१७, पंजाब १३१९ या प्रमाणे पहिल्या दिवशीच्या लसीकरणाचे आकडे आहेत. मणिपूरमध्ये ५८५, नागालँड ५६१, मेघालय ५०९, गोवा ४२६, त्रिपुरा ३५५, मिझोराम ३१४, पुडुचेरी २७४, चंडीगड २६५, अंदमान व निकोबार २२५, सिक्कीम १२०, दादरा नगर हवेली ८०, लडाख ७९, दमण व दीव ४३, लक्षद्वीप २१या प्रमाणे लसीकरण झाले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३५२ लसीकरण सत्रे झाली, त्यात १९११८१ जणांना लस देण्यात आली.

परिचारिका आजारी, प्रकृती स्थिर

कोलकाता : येथे पस्तीस वर्षे वयाची परिचारिका लस घेतल्यानंतर आजारी पडली असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळामार्फत या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. या परिचारिकेला लस दिल्यानंतर भोवळ आली. आरोग्य खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून सदर परिचारिकेची प्रकृती  स्थिर आहे.

दिल्लीत किरकोळ बाधेची ५१ प्रकरणे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शनिवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुरळ उमटणे, सूज येणे किंवा ताप येणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसण्याची एकूण ५१ प्रकरणे आढळली.

दिल्लीत निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त ५३ टक्के लोकांनी कोविड-१९ची लस टोचून घेतली. ‘थांबा आणि वाट पाहा’ भूमिका, संवादाचा अभाव आणि को-विन अ‍ॅपमधील त्रुटी ही त्याची कारणे असल्याचे तज्ज्ञांनी रविवारी सांगितले.

दिल्लीत नोंदणी झालेल्यांपैकी ५३.३ टक्के, म्हणजे ४३१९ आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी लस देण्यात आली. राजीव गांधी विशेषोपचार रुग्णालयात ४५ जणांना लस देण्यात आली.

‘एम्स’मधील एका सुरक्षारक्षकाला करोनाच्या लशीचा डोज घेतल्यानंतर अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन झाली. त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नगरमध्ये आठ जणांना त्रास

नगर : करोना प्रतिबंध लस घेतल्यानंतर नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना त्रास झाला. खबरदारीचा  उपाय म्हणून तीन आरोग्य सेविकांवर  जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोखरणा यांनी  सांगितले.