श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात बुधवारी सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेलेला दहशतवादी हा जैश ए महंमदचा सदस्य व पाकिस्तानी नागरिक होता, तसेच तो अनेक गुन्ह्य़ात पोलिसांना हवा होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

अबु सैफुल्ला व अबू कासिम या टोपण नावाने तो कारवाया करीत होता. तो दक्षिण काश्मीरमधील दहशतवादग्रस्त भागात गेले दीडवर्ष कारवाया करीत होता. सैफुल्ला हा अपहरण व दोन नागरिकांच्या हत्येप्रकरणी हवा होता. त्याने पोलिस अधिकारी व स्थलांतरित कामगारांना धमक्याही दिल्या होत्या. जैश ए महंमदचा पाकिस्तानातील प्रमुख कमांडर कारी यासीर याचा तो निकटचा साथीदार होता. यासीर हा जुलै २०१३ मध्ये कुपवाडा जिल्ह्य़ात मारला गेला होता. मंगळवारी सकाळी पुलवामातील अवांतीपोरा भागात झैनत्राग खेडय़ात चकमकीवेळी अबु सैफुल्ला हा त्याच्या साथीदारांसह सापडला होता. त्या वेळी चकमक झाली असता दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. या दहशतवाद विरोधी मोहिमेत  राष्ट्रीय रायफल्स व केंद्रीय राखीव पोलिस दल यांचे अनुक्रमे ५० व १८५ जवान सहभागी होते. यात शिपाई राहुल रंसवाल व  शहाबाझ अहमद हे जखमी झाले होते, त्यांना नंतर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

जवानांना हलवत असताना दहशतवादी पसार झाले होते, पण नंतर नागंदेर या वनक्षेत्रात ते पुन्हा सापडले असता झांट्राग येथे चकमक झाली. त्यात सैफुल्ला हा मारला गेला. त्याचे साथीदार पळून गेले.