करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात जीवनावश्यक गोष्टीचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या काळात वैद्यकीय सेवा पुरवणारे अधिकारी, डॉक्टर, पोलिस हे सतत काम करत आहेत. मात्र देशातील काही भागांमध्ये नागरिक लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर येताना दिसत आहेत. अशा लोकांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांवर ताण येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इंदूरमध्ये डॉक्टरांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, नियम मोडणाऱ्यांना त्यांनी सज्जड दम भरला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर चौहान यांनी, मानवाधिकार हे फक्त माणसांसाठी असतात…अशा आशयाचं ट्विट करत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत दिले आहेत.

इंदूरमधील छतरीपुरा पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमध्ये पोलिस आणि डॉक्टरांचं एक पथक तपासणीसाठी गेलं होतं. यावेळी स्थानिक नागरिकांनी डॉक्टरांच्या पथकाला शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी स्थानिकांनी डॉक्टरांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी असे प्रकार कदापी सहन केले जाणार नाही असं बजावत, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होईल असंही म्हटलं आहे. याचसोबत सध्याच्या खडतर काळात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मी ऋणी असल्याचंही चौहान म्हणाले. तुमची सुरक्षा ही माझी जबाबदारी असल्याचं चौहान यांनी स्पष्ट केलं.