पावसाळ्यात मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या सातत्याने कोलडमत असलेल्या वेळापत्रकाची थेट लोकसभेत तक्रार केली आहे. तसेच, वर्षभरात रेल्वेचे ५२ दिवस मेगाब्लॉक असतात. तरीसुद्धा उपनगरीय रेल्वे वेळेवर धावत नाही. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती देखील शिंदे यांनी व्यक्त केली. या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची त्यांनी भेटही घेतली आहे.

याबाबत बोलताना खासदार शिंदे म्हणाले की, उपनगरीय रेल्वेपासून सर्वात जास्त महसूल मिळूनही उपनगरीय रेल्वेत सर्वात जास्त समस्या आहेत. आठवड्याला पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते आणि त्याचा फटका रोज लाखो लोकांना बसतो. गेल्या काही वर्षांपासून या रेल्वे सेवेत सतत काही ना काही बिघाड होत आहे. कधी रेल्वे रुळांमध्ये काही समस्या तर कधी पेंटाग्राफमध्ये बिघाड तर कधी सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड, थंडी आणि पावसात रेल्वेमध्ये बिघाड होणे आता नित्याचीच बाब झाली आहे. उपनगरीय रेल्वेपासून सर्वात जास्त महसूल मिळूनही उपनगरीय रेल्वेत सर्वात जास्त समस्या आहेत. ही बाब डॉ. शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबरोबरच रेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात गेली अनेक वर्षे सातत्याने शंका उपस्थित होत असून पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी रुळांपासून दहा मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधली जावी, कल्याण-मुंबई उपनगरी मार्गावर सेवेचा खोळंबा झाल्यास विनाविलंब जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर अथवा धीम्या गाड्या जलद मार्गावर आणाव्यात, तसेच पाणी जिथे जास्त साचते तिथे पंप लावून पाणी काढायची सुविधा असावी अशीही मागणी डॉ. शिंदे यांनी केली.