१९९० मध्ये अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्यामागे बाबरी मशीद वाचवणे आणि देशाची एकता राखणे हे उद्देश होते, असे सांगत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी त्याचे समर्थन केले. येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.
येथील जाहीर सभेत त्यांनी मुस्लीम समुदायाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. इतर पक्ष केवळ मतांसाठी मुस्लिमांचा वापर करतात. मात्र आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मुस्लिमांचा पोलीस दलात सहभाग वाढावा यासाठी आपण प्रयत्न केले. सध्या उत्तर प्रदेशात प्रत्येक पोलीस ठाण्यात एक मुस्लीम असल्याचे त्यांनी सांगितले.
दोषी लोकप्रतिनिधींच्या अध्यादेशाच्या मुद्दय़ावरून राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहता, काँग्रेसने पंतप्रधानांची प्रतिमा मलिन केली, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केला. ज्या पद्धतीने काँग्रेसने पंतप्रधानांना लक्ष्य केले ते पाहता त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता, अशी अपेक्षा मुलायमसिंहांनी व्यक्त केली. काँग्रेस आणि भाजपवरील जनतेचा विश्वास उडाला असून लोक समाजवादी पक्षाकडे पर्याय म्हणून पाहत असल्याचा दावा मुलायमसिंहांनी केला. पुढील लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला बहुमत मिळेल असा दावा त्यांनी केला.