मुंबईतील एक मरीन इंजिनिअरींग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचे दिल्लीच्या चाणक्यपुरीमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून अपहरण करण्यात आले होते. सहा तास चाललेले हे अपहरण सहा जणांच्या अटकेने शनिवारी संपुष्टात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये चार महिला आहेत. ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी लक्ष्मी नगरमधील एका घरात या व्यवस्थापकीय संचालकाला बंधक बनवून ठेवले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दिल्ली पोलिसांना व्यवस्थापकीय संचालकाला ओलीस ठेवले असल्याचा फोन आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यवस्थापकीय संचालक एक महिलेसोबत हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे पोलिसांनी पाहिले. हॉटेलच्या आवारात पार्क केलेल्या एका गाडीमध्ये दोघे बसले आणि निघून गेले. रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांची अनेक पथके ही गाडी शोधत होती. त्याच दरम्यान अपहरणकर्ते कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीच्या पैशांसाठी फोन करत होते.

पोलिसांनी कार मालकाचा पत्ता शोधून काढला. कार मालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणही या कटाचा भाग असल्याचे त्याने मान्य केले. त्याने दिलेल्या माहितीवरुन या व्यवस्थापकीय संचालकाला लक्ष्मी नगरमधल्या ज्या घरात ठेवले होते त्या ठिकाणी छापा मारुन पोलिसांनी त्याची सुटका केली व रुग्णालयात दाखल केले.

मुंबईवरुन एक बिझनेस ट्रीपसाठी आपण दिल्लीला आलो होतो. शुक्रवारी संध्याकाळी एका महिलेचा फोन आला ती मला ओळखत होती. तिला मला भेटायचे होते. ती तिच्यासोबत आणखी एका महिलेला घेऊन आली. त्या दोघींनी आणखी एका मैत्रिणीसोबत भेट घडवून देतो असे सांगून सोबत येण्यासाठी राजी केले अशी माहिती व्यवस्थापकीय संचालकाने पोलिसांना दिली.