मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे सहा नागरिकही ठार झाले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांचे आम्ही स्मरण करतो आणि या हल्ल्यास जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी ट्वीट केले आहे.

या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याने अमेरिकेतील भारतीय आणि विविध गट अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर निदर्शने करणार आहेत. हल्लेखोर पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत असल्याचे या निदर्शकांच्या आयोजकांनी म्हटले आहे.

इस्राएलचेही पाकिस्तानला आवाहन

जेरुसलेम : मुंबईवर २००८ मध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कडक शासन करावे, असे आवाहन इस्राएलने मंगळवारी पाकिस्तानला केले. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या १० सशस्त्र दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यामध्ये १६० जण ठार झाले होते. ठार झालेल्यांत  इस्राएलचे सहा नागरिक होते. आम्ही भारतीय जनतेच्या पाठीशी आहोत, असे इस्राएलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमहासंचालक गिलॅड कोहेन यांनी ट्वीट केले आहे.