जहाजावरील आपल्या सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी तुरुंगात १६ वर्षे व्यतीत करणाऱ्या आरोपीस सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुक्त केले. याप्रकरणी त्याला तुरुंगवास आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. खंडपीठाचे न्या. पी. सतशिवम् आणि एम.वाय.इक्बाल यांनी यासंबंधी निर्णय देताना जहाजावरील सुकाणूचालक माजेन्द्रन लंगेश्वरन् याची मुक्तता केली. याप्रकरणी लंगेश्वरन् याला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती, तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. खंडपीठाने सदर निकाल रद्दबातल ठरविला. शिवरामन् या अन्य सुकाणूधारकाच्या हत्येचा आरोप लंगेश्वरन्वर ठेवण्यात आला
होता. सदर घटना ३० नोव्हेंबर १९९६ रोजी घडली. या खूनप्रकरणी फिर्यादी पक्षाने सादर केलेला पुरावा अपुरा असून मृत व्यक्तीवर नेमका हल्ला कोणी केला हे स्पष्ट होत नसल्याचे मत खंडपीठाने मांडले. आरोपीविरोधात पुरावा म्हणून रक्तलांच्छित असे दोन सुरे सादर करण्यात आले, परंतु दुसऱ्या सुऱ्याने कोणी हल्ला केला, हे स्पष्ट होत नाही, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.