आसामच्या राज्यपालांच्या वक्तव्याने वाद

हिंदुस्तान हे हिंदूूंसाठी असे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी नवा वाद निर्माण केला आहे. भारतातील मुस्लिमांना त्रास होत असल्यास पाकिस्तानमध्ये जाण्यास मोकळे आहेत असे रविवारी येथे वक्तव्य केले आहे. आसाममध्ये पुढील वर्षांच्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर राज्यपालांच्या या वक्तव्याने वाद होण्याची चिन्हे आहेत.
विविध देशांमधील हिंदूंनी येथे राहण्यात काहीच गैर नाही असे वक्तव्य शनिवारी आचार्य यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना केले होते. त्यावर वाद होताच स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
भारत हा जगातील सर्वात सहिष्णू देश आहे. बाहेरील देशांमध्ये छळ होत असल्यास हिंदूंना येथे येण्याचा अधिकार आहे. कारण त्यांना दुसरी कोणतीच जागा नाही. मात्र मुस्लिमांना त्रास होत असल्यास पाकिस्तानात किंवा इतर कोणत्याही देशात जावे असे वक्तव्य त्यांनी केले. भारतीय मुस्लिमांना येथे रहावे असे वाटत असेल तर त्यांनी थांबावे. अनेक जण पाकिस्तानमध्ये गेले आहेत.
तसलिमा नसरीन यांना त्रास झाल्यावर त्यांना आम्हीच मदत केली होती. त्यामुळे मुस्लीम येथे आले तर त्यांना आश्रय देऊ. आम्ही मोठय़ा मनाचे आहोत, असे आचार्य यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये एखाद्या हिंदूला त्रास झाल्यास त्याला भारतात येण्याचा अधिकार आहे. त्याला स्वीकारणे हे आमचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट केले.

काँग्रेसची टीका
आसामच्या राज्यपालांचे वक्तव्य धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया काँग्रसने दिली आहे. घटनात्मक जबाबदारी टाळून भाजप व संघाच्या इशाऱ्यावरच राज्यपाल काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. एखाद्या राजकीय नेत्याने असे वक्तव्य करणे वेगळे मात्र राजकीय पक्षाचा भाग असल्याप्रमाणे राज्यपाल बोलत असल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

पद्मनाभ आचार्य