उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली एका महिलेला भर सभेमध्ये बुरखा काढण्यास भाग पडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला भाजप समर्थक असून योगी यांचे भाषण ऐकण्यासाठी सभेला आली होती.

मंगळवारी दुपारी बलिया येथील भर सभेत मुस्लीम महिलेला बुरखा उतरवायला भाग पाडल्याचा व्हिडिओ एनएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केला आहे. मी नेहमीच बुरखा परिधान करुन घराबाहेर पडते. पण आजपर्यंत कधीही मला सर्वांसमोर कोणत्याही कारणासाठी बुरखा काढण्यास सांगण्यात आले नव्हते असे या घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना संबंधित महिलेने सांगितले. या प्रकारानंतर ही महिला थोडी गडबडल्यासारखी वाटली तरी तिने योगी यांचे संपूर्ण भाषण ऐकले.

नक्की काय घडले

योगींच्या सभेसाठी नेहमीप्रमाणे मोठा सुरक्षा बंदोबस्त सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. सभेमध्ये महिलांना बसण्यासाठी मंचाच्या बाजूला एक भाग राखीव ठेवण्यात आलेला. अनेक महिला तिथे बसल्या होत्या. त्याचवेळी सायरा नावाची ही महिला बुरखा घालून तिथे पोहचली आणि खुर्चीवर बसली. बुरख्यातील महिलेला पाहताच सभेच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांपैकी तीन महिला पोलिस तिच्या जवळ पोहचल्या. व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे त्यांनी तिला बुरखा काढण्यास सांगितले. सायराने बुरख्याचा डोक्याकडील भाग काढला आणि डोक्यावर ओढणी घेतली. मात्र त्यानंतरही महिला पोलिसांनी तिला संपूर्ण बुरखा काढण्यास सांगितले. सायराने बुरखा काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिच्या ड्रेसमध्ये अडकला. त्यावेळी तिच्या बाजूला बसलेल्या बाकी महिलांनी खेचून तिचा बुरखा काढला. काढलेला बुरखा महिला पोलिसांनी सायराला दिला मात्र तितक्यात तिथे पोहचलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सायराचा बुरखाही जप्त केला.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने केली टिका

सायराने या घटनेला जास्त महत्व दिले नसले तरी ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. जगातील कोणताही देश किती स्वतंत्र विचारांचा असला तरी सुरक्षारक्षकांकडून महिलांची तपासणी पडदे लावलेल्या केबिनमध्येच होते. पण अशाप्रकारे भर सभेत एखाद्या महिलेला बुरखा काढण्यास भाग पाडणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. यासाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना शासन करण्यात यावे अशी मागणी बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद राशिद फिरंगी महली यांनी केली.