लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून पुन्ह सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय यात काही शंका नाही. त्यातच आता एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात जन्मलेल्या चिमुकल्याचे नाव नरेंद्र मोदी असं ठेवल्याचं समोर आलं आहे.

23 मे अर्थात मतमोजणीच्या दिवशी एकीकडे पंतप्रधान मोदी ऐतिहासीक विजयाकडे वाटचाल करत असताना उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. येथील मोहम्मद इदरीश आणि मैनाज बेगम या दांपत्याला मतमोजणीच्या दिवशीच मुलगा झाला, मग मुलाचं नाव काय ठेवायचं याबाबत चर्चा सुरू झाली. मैनाज बेगम यांनी मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा हट्ट केला. त्यावर कुटुंबातील अन्य सदस्यांनी मैनाज बेगम यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला. त्यानंतर दुबईमध्ये नोकरीसाठी असलेल्या त्यांच्या पतीनेही फोनवरुन त्यांना समजावलं, पण नरेंद्र मोदी हेच नाव ठेवण्याचा बेगम यांनी आग्रह कायम ठेवला अखेर कुटुंबीयांनी मोदी नाव ठेवण्यास संमती दिली.


मुलाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी पंचायत कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाकडे याबाबत अर्ज केला आहे. दरम्यान, ‘नरेंद्र मोदी देशासाठी चांगलं काम करत आहेत. उज्ज्वला योजना, जनधन खाते, अशा अनेक योजनांमुळे गरीबांचा फायदा झालाय, तिहेरी तलाक संदर्भात कायदा करुन मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं म्हणत बेगम यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं. सोशल मीडियामध्ये याबाबत वृत्त पसरताच बेगम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांनी सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समाजापढे ठेवल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.