करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या काळात अनेक कामगार व मजूर इतर राज्यांत अडकलेले आहेत. सध्याच्या खडतर काळात हातावर पोट असणाऱ्या या मजुरांना अनेक कष्ट सोसावे लागत आहेत. या काळात अनेक लोकं, जात-पात, धर्म-पंथ या गोष्टी विसरुन एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुतारकाम करणाऱ्या पंजाबमधील एका शीख मजुरावर स्थानिक मुस्लीम व्यक्तींनी अंत्यसंस्कार करत माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.

रणवीर सिंह असं मृत कामगाराचं नाव असून तो गंडर्बल जिल्ह्यातील वाकुरा गावात सुतारकाम करत होता. आपल्या काही कामगारांसह खोली भाड्यावर घेत रणवीर गावात राहत होता. रणवीरच्या मृत्यूची बातमी त्याचे साथीदार व स्थानिक गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाला कळवली. “स्थानीक लोकांनी यावेळी एकत्र येत रणवीर सिंह याच्यावर अंत्यसंस्कार केले. यासाठी लागणारा खर्चही त्यांनीच उभा केला. माणुसकीच्या नात्यातून रणवीर सिंहच्या पत्नीच्या बँक खात्यात स्थानिकांनी काही रक्कम जमा केली आहे. लॉकडाउन काळात रणवीरचं पार्थिव पंजाबला नेणं शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.” स्थानिक तहसीलदार गुलाम मोहम्मद भट यांनी पीटीायला माहिती दिली.

माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असो संकटकाळात त्याची मदत करणं हे आपलं कर्तव्य असल्याची भावना स्थानिक गावकरी अब्दुल रेहमान यांनी बोलून दाखवली. वाकुरा गावात अनेक परप्रांतीय मजुर कामासाठी येत असतात. त्यामुळे शक्य होईल तशी मदत इथले स्थानिक या मजुरांना करत असतात. काही कामगार तर आमच्या परिवाराचा भाग होतात. रणवीरच्या मृत्यूची बातमी समजताच याच भावनेतून गावकऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्याचं रेहमान यांनी सांगितलं.