बिहारमधील मुजफ्फरपूर येथील शेल्टर होम बलात्कार प्रकरणी माजी मंत्री मंजू वर्मा यांच्यावर चहूबाजूंनी होत असलेली टीका आणि सुप्रीम कोर्टाने केलेल्या तिखट टिपण्णीनंतर अखेर त्यांनी मंगळवारी कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. मंजू वर्मा या बुरखा घालून आत्मसमर्पण करण्यासाठी कोर्टात पोहोचल्या असल्याचे माध्यमांतील वृत्तानुसार कळते.

गेल्या काही दिवसांपूर्वी याप्रकरणी सुनावणी करताना तिखट टिपण्णी केली होती. सुप्रीम कोर्टाने बिहार सरकारला फटकारत राज्याच्या डीजीपींना हजर होण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या बेगूसराय येथील घराबाहेर संपत्ती जस्त करण्यासंबंधीची नोटीस चिकटवली होती. अशा प्रकारे वाढत्या दबावानंतर अखेर वर्मा यांनी आज मंझौल कोर्टात आत्मसमर्पण केले.

यापूर्वी मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांच्याविरोधात चेरिया बरियारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंजू वर्मा फरार झाल्या होत्या. दरम्यान, मंजू वर्मा यांच्या पतीने २९ ऑक्टोबर रोजी कोर्टासमोर आत्मसमर्पण केले होते.