आपल्या दोन काकाकडूनच वारंवार बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय पीडितेने अहमदाबादच्या मेहसाणा येथील रुग्णालयात बाळाला जन्म दिला. मात्र, या बाळाचे नराधम काकांनी अपहरण करून त्याला ठार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळच्या जमालपूर गावात वास्तव्याला असणाऱया या पीडितेने २४ एप्रिल रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्या दोन काकांविरोधात वारंवार बलात्कार आणि अमानुष छळ केल्याची तक्रार नोंदवली होती.
तीन महिन्यांपूर्वीच पीडितेचा विवाह झाला होता पण, तिच्या पतीसोबत दोन काकांनी भांडण करून जबरदस्तीने तिला परत माहेरी आणले. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवतीचे आई-वडिल मानसिकरित्या अस्थिर असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिचे दोन काकाच तिची काळजी घेत होते. दोन्ही काका अविवाहित असून ते आपल्या कौटुंबिक मालकीच्या शेत जमिनीवरच राहत होते. तर, पीडिता आपल्या आई-वडिलांसोबत गावात राहत होती. मात्र, दोन्ही काका तिला जबरदस्तीने शेतात बोलावून बलात्कार करत असत आणि याबद्दल पालकांना सांगितल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागण्याची धमकी देत असत. तसेच ती पोलीस ठाण्यात जाणार नाही याची खबरदार घेत तिच्यावर पहारा देखील काकांनी ठेवला होता.
पीडितेचे लग्न झाल्याच्या दोन महिन्यांतच तिच्या पतीशी भांडण करून या दोन नराधम काकांनी तिला जबरदस्तीने आपल्या घरात डांबून ठेवले. तिच्या आई-वडिल आणि भावाला देखील भेटू दिले नाही. यानंतर ती गरोदर असल्याचे समजताच नराधम काकांनी पीडितेच्या गरोदरपणाची कोणालाच माहिती कळू नये यासाठी अहमदाबादबाहेरील एका रुग्णालयात तिला दाखल करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात पीडितेची प्रसुति झाल्यानंतर आरोपी काकांनी बाळाला एका बॅगमध्ये टाकून रुग्णालयातून पळवून नेले. चिमुकल्या बाळाला जीवे मारून त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर तिच्या भावाला आपल्या बहिणीचा सुगावा लागला आणि तो त्वरित रुग्णालयात पोहोचला. यानंतर अहमदाबादच्या स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना संपूर्ण माहिती देऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तिच्या एका काकाच्या मुसक्या आवळल्या तर, दुसरा काका अजूनही फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर असून नवजात बाळाला पुरलेल्या ठिकाणी जाऊन पुढील तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे.