तेलुगू चित्रपटसृष्टीचे अध्वर्यू अक्केनेनी नागेश्वरराव यांना सोमवारी हजारो चाहते, नामवंत चित्रपट कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
नागेश्वरराव यांचे दोन पुत्र वेंकट, अभिनेता नागार्जुन तसेच अन्य कुटुंबीयांनी येथील अन्नपूर्णा स्टुडियोत नागेश्वरराव यांच्या पार्थिवास अग्नी दिला. त्याआधी नागेश्वरराव यांच्या कुटुंबीयांखेरीज त्यांच्या नातवंडांनीही राव यांना आदरांजली अर्पण केली. तत्पूर्वी, नागेश्वरराव यांचे असंख्य चाहते तसेच त्यांच्या हितचिंतकांना राव यांचे अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी त्यांचे पार्थिव ‘फिल्म चेंबर’ इमारतीत काही काळ ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अन्नपूर्णा स्टुडियोत नेण्यात आले. त्यावेळी निघालेल्या अंत्ययात्रेत राव यांचे हजारो चाहते सामील झाले होते.
केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजीवी, माजी मंत्री टी. सुब्बिरामी, राज्यमंत्री के.व्ही.कृष्णा रेड्डी, डी.नागेंद्र, ज्येष्ठ निर्माते डी. रामा नायडू व लोकप्रिय अभिनेता व्यंकटेश हेही नागेश्वरराव यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान, नागेश्वरराव यांना गुरुवारी कर्नाटक विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.