अनेक धोरणात्मक बाबतीत न्यायालयाने सरकारला आदेश दिताना आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. पण केरळच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना मात्र एक अनोखा निर्णय घ्यावा लागला आहे. केरळ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी एका पाच वर्षीय मुलाचे नामकरण केले आहे. नामकरण करण्यावरून विविध धर्माचे असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. अखेर न्यायालयाने त्या मुलाचे नामकरण केले. देशभरात याचीच चर्चा सध्या सुरू आहे. मुलाचे वडील हिंदू असल्यामुळे त्यांना त्याचे नाव ‘अभिनव सचिन’ ठेवायचे होते. तर आई ख्रिश्चन असल्यामुळे ती ‘जॉन मनी सचिन’ या नावासाठी आग्रही होती. न्या. ए.के. जयशंकरन नांबियार यांनी अखेरीस ‘जॉन सचिन’ या नावावर शिक्कामोर्तब करून जन्म दाखला वितरीत करण्याचा आदेश दिला.

मुलाच्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. मुलाचे नामकरण करण्यावरून दोघांमध्ये एकमत न झाल्याने दोघांनीही वेगवेगळ्या नावाने जन्म दाखला देण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. ख्रिश्चन दिक्षा नामकरण प्रमाणपत्रावर मुलाचे नाव जॉन मनी सचिन लिहिण्यात आल्याचा दावा आईने केला होता. तर मुलगा २८ दिवसांचा असताना केलेल्या नामकरण विधीत मुलाचे नाव अभिनव सचिन ठेवल्याचे वडिलांचा दावा होता.

संबंधित महिलेने नंतर न्यायालयाला मुलाच्या नावामधील मनी हा शब्द काढण्यास परवानगी दिली. पण पती मात्र अभिनव नावावर ठाम होता. अखेर न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, ज्या नावावर दोघेही सहमत होतील असे जॉन सचिन असे मुलाचे नामकरण करण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला आहे. जॉन हे आईकडील तर सचिन हे वडिलांचे पहिले नाव आहे. त्यामुळे हे नाव स्वीकारावे.