भारतात आयफोनचं उत्पादन करणारी तैवानची कंपनी विस्ट्रॉनच्या बंगळुरूमधील कार्यालयात गेल्या आठवड्यात तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली होती. विस्ट्रॉनच्या बंगळुरुमधील कारखान्यात आय़फोन आणि अन्य कंपन्यांसाठी मोबाइलची निर्मिती केली जाते. कर्नाटक सरकारने या हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसंच, कर्मचाऱ्यांना त्यांचं थकीत वेतन मिळवून देण्याचेही आश्वासन दिले होतं. दरम्यान, विस्ट्रॉन या कंपनीनं कर्मचाऱ्यांचं वेतन थकवल्या बद्दल माफी मागितली असून कंपनीच्या भारतातील उपाध्यक्षांचीही हकालपट्टी केली आहे.

बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेनंतर कंपनीनं अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीमद्ये कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात विलंब होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर कंपनीनं आपली चूक मान्य करत कर्मचाऱ्यांचीदेखील माफी मागितली आहे. तसंच भारतातील व्यवसाचे उपाध्यक्ष विंसेंन्ट ली यांनादेखील हटवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. संपूर्ण प्रक्रिया उत्तमरित्या चालावी आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी टीम पुन्हा स्थापन करण्यात येणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं.

बंगळुरूतील या घटनेनंतर Apple नं देखील कंपनीला झटका देत कंपनीला प्रोबेशनवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत विस्ट्रॉन ही कंपनी आपल्या चुका पूर्णपणे सुधारत नाही तोवर कंपनीला कोणताही व्यवसाय न देण्याचा निर्णय Apple नं घेतला आहे. विस्ट्रॉनच्या नारासापुरा येथील प्रकल्पात झालेल्या घटनेचा तपास करण्यासाठी Apple चे कर्मचारी आणि कंपनीद्वारे नियुक्त करण्यात आलेले ऑडिटर्स सातत्यानं काम करत आहेत असंही कंपनीनं सांगितलं.

Apple कडूनही माफी

आमच्या टीमच्या सर्व सदस्यांची सुरक्षा आणि त्यांचं कल्याण याला कंपनी कायमच प्राधान्य देत आली आहे. बंगळुरू येथील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात घडलेल्या घटनेचा आम्ही तपास करत आहोत आणि यादरम्यान कंपनीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिलं नसल्याचं समोर आलं आहे. या बाबत आम्हाला वाईट वाटत असून आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांची माफी मागत आहोत, असं Apple नं म्हटलं आहे.