विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत २०३० पर्यंत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायन्स काँग्रेसमध्ये प्रकट केला आहे.  भविष्यात भारत विज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती साधून या जगात दबदबा निर्माण करेल असे पंतप्रधानांनी म्हटले. आपले संशोधन जास्तीत जास्त प्रमाणात समाजभिमुख करीत वैज्ञानिकांनी ज्या समाजात आपण राहतो त्याच्या प्रगतीची आणि विकासाची जबाबदारी घ्यायला हवी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपती येथे झालेल्या विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा विद्यापीठामध्ये सायन्स काँग्रेसचे उद्घाटन झाले. ज्या प्रमाणे कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी ही संकल्पना आहे त्याच धर्तीवर सायन्टिफिक सोशल रिसपॉन्सिबिलिटी अशी संकल्पना मांडून वैज्ञानिकांनी आपले संशोधन समाजाभिमुख करुन जनतेशी आपली नाळ जोडावी असे पंतप्रधानांनी म्हटले.

वैज्ञानिकांनी समाजासाठी केलेल्या कामांचे त्यांनी कौतुकही केले. ज्या वैज्ञानिकांनी आपली आयुष्य वेचून, परिश्रमाने समाजाला उन्नत केले त्यांचे ऋण हा देश कधीही विसरणार नाही असे ते म्हणाले. देशाला प्रगती साधायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटसे. सायबर-भौतिक प्रणाली या क्षेत्रात भारताने काम करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाली.