पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाझीपूरमधील सभेत आरोप

कर्नाटक सरकारने सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आतापर्यंत त्यांनी केवळ ८०० शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून आश्वासन पाळलेले नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. गाझीपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभात त्यांनी सांगितले की, कर्नाटकात केवळ ८०० शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले ही थट्टा आहे.

ते म्हणाले, कर्नाटक सरकारने आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत त्यामुळे काँग्रेस व मित्र पक्षांवर विश्वास ठेवू नका. काँग्रेसने लालीपॉप दाखवली पण लोकांचा विश्वासघात करून शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत, या लालीपॉप वाल्यांबरोबर तुम्ही जाणार आहात का हे ठरवा.

देशासाठी अहोरात्र न थकता  काम करणारा मी जनतेचा चौकीदार आहे असे सांगून  ते म्हणाले की,  पुढील काळ तुमचा आहे, तुमच्या मुलांचा आहे. तुमचे व तुमच्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी हा चौकीदार प्रामाणिकपणे काम करीत आहे.  त्यामुळे काही चोरांच्या झोपा उडाल्या आहेत व तुमच्या आशीर्वादाने त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्र पक्षांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. आदित्यनाथ सरकारमधील मंत्री व एसबीएसपीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी सांगितले की, आम्ही पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला कारण मागास नेते महाराजा सुहेलदेव राजभर यांच्यावर जे टपाल तिकीट जारी करण्यात आले त्यावर त्यांचे पूर्ण नाव नाही. अपना दलनेही कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

त्यांच्या सदस्य अनुप्रिया पटेल केंद्रात मंत्री असून मिर्झापूरच्या खासदार आहेत. अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, अपना दलचे नेते व आपले पती आशिष पटेल यांनी भाजपवर लहान पक्षांकडे दुर्लक्षाचा केलेला आरोप योग्यच आहे. अपना दलचा उत्तर प्रदेशातील १५ मतदारसंघात प्रभाव आहे.

भाजपनेते उर्मट बनल्याचा आरोप

अपना दलचे नेते आशिष पटेल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने पंतप्रधानांच्या गाझीपूर येथील कार्यक्रमावर बहिष्कार टाकला कारण भाजपचे राज्यातील नेते उर्मट बनले आहेत. ते कमकुवत गटाच्या समाजाचा अपमान करीत आहेत. आम्ही सरकारच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी नाही. आता पंतप्रधानांनीच राज्यातील नेत्यांच्या उर्मटपणावर उपाय काढावा.