अनेक वर्षे ‘हाल’ सहन केल्यानंतर तोंडी तिहेरी तलाकच्या जोखडातून स्वत:ला मुक्त करण्याचा मार्ग मुस्लीम महिलांना सापडला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले. या प्रथेला गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेने मंजूर केल्यानंतर मोदी यांनी या मुद्दय़ावर प्रथमच मतप्रदर्शन केले.

मुस्लीम महिलांना समान संधी देण्याबाबत आपले सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर भर देताना पंतप्रधानांनी एकटय़ा मुस्लीम महिलेला हज यात्रेला जाण्याची परवानगी देण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही उल्लेख केला. केरळातील  शिवगिरी यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोदी यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण झाले. शिवगिरी हे समाजसुधारक  नारायण गुरू यांचे पवित्र स्थान आहे.

नुकत्याच लोकसभेत संमत झालेल्या ‘मुस्लीम विमेन प्रोटेक्शन राइट्स ऑन मॅरेज’ विधेयकाचा उल्लेख न करता मोदी म्हणाले की, त्रिवार तलाकमुळे मुस्लीम माता-भगिनींचे जे हाल होत होते, ते कुणापासून लपून राहिलेले नव्हते. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांना तिहेरी तलाकच्या प्रथेपासून स्वत:ला मुक्त करून घेण्याचा मार्ग सापडला आहे.

या विधेयकामुळे तिहेरी तलाक किंवा ‘तलाक-ए-बिद्दत’ बेकायदेशीर ठरला असून, तो देणाऱ्या पतीला ३ वर्षांपर्यंतच्या कैदेची त्यात तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरवण्यात आला आहे. या कायद्याच्या आराखडय़ानुसार संबंधित महिला निर्वाह भत्ता मागू शकते आणि मुलांचा ताबा मिळण्यासाठीही दावा करू शकते.