संवाद आणि चर्चेतूनच वाद सोडवता येतात, असा अप्रत्यक्ष संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर चीनला दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही डोकलाम प्रश्नावर राज्यसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. युद्धामुळं कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतात, असं त्या म्हणाल्या होत्या.

संवाद – ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन कॉन्फ्लिक्ट अॅव्हॉयडन्स अॅण्ड इन्वायरमेंट कॉन्शियसनेस’ ‘Samvad – Global Initiative on Conflict Avoidance and Environment Consciousness’ या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना त्यांनी हा संदेश दिला. मोदी म्हणाले, की ‘जगभरातील समुदायांमध्ये मतभेद आणि देश आणि समाजांमध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्या धार्मिक रुढी आणि पूर्वग्रह यांना केवळ संवादाच्या माध्यमातूनच दूर करता येऊ शकतं.’ एकमेकांशी जोडलेला आणि एकमेकांवर अवलंबून असलेले २१ व्या शतकातील हे जग सध्या दहशतवाद ते वातावरण बदल आदी समस्यांशी झगडत आहे. त्यावर संवाद आणि चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढता येऊ शकतो. हीच आशियाची प्राचीन परंपरा आहे, असंही मोदी म्हणाले.

संवाद आणि वादविवाद यावर प्राचीन भारताचा तर्कशास्त्राचा सिद्धांत आधारित आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मोदींनी राम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि भक्त प्रल्हाद यांची उदाहरणे दिली. त्यांनी केलेल्या प्रत्येक कर्माचा उद्धेश हा धर्म टिकवून ठेवण्याचा होता, असंही त्यांनी सांगितलं.